मुंबई: यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. त्यामुळे शिंदे गट या मैदानासाठी ताकद लावणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.


आता गणपती आहे, त्यानंतर दसरा आहे, त्यावेळी दसरा मेळाव्याचं बघू असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला एकनाथ शिंदेंचीही तोफ धडाडणार हे आतापर्यंत स्पष्ट झालंय. 


दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे यांच्यात संघर्ष सुरु आहे. पण शिवाजी पार्कवर कुणाची तोफ धडाडणार याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. पण शिंदे गटाची मात्र हालचाल सुरु झालीय. काही महत्त्वाच्या आमदारांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक पार पडल्याची माहिती असून या बैठकीत शिवतीर्थावर मेळाव्याच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यात आला आहे. 


शिवसेनेकडून परवानगीबाबतचं पत्र देऊन आठवडा उलटला पण पालिकेनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही आणि यावरुनच आता शिवसेनेचा जीव टांगणीला लागला आहे. तर दसरा मेळावा कुणाचा या वादात आता पवारांनी उडी घेत संघर्ष टाळण्याचा सल्ला शिंदेंना दिला आहे. 


दसऱ्याला तोफ कुणाची धडाडणार कुणाला परवानगी मिळणार हे पुढील काही दिवसात समजेल. पण त्याआधीच आरोप प्रत्यारोपानं राजकीय मैदान मात्र गाजलंय.


शिंदे सेनेचा मेळावा शिवतीर्थावरच? तयारी पूर्ण? 


शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होईल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार शिवतीर्थावरच मेळावा घ्यायच्या तयारीला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि काही महत्त्वाच्या आमदारांची एक भेट झाली आहे. त्या बैठकीत शिवतीर्थावर मेळाव्याच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यात आला. या तयारीत कार्यकर्ते कोणत्या गेटनं आत येणार? नेते मंडळी कुठे आणि कसे बसणार? इतर जिल्ह्यातून ट्रेनने कार्यकर्ते येणार असल्याची माहिती आहे. ट्रेनने येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्या गेटनं आत घ्यायचं, व्हीव्हीआयपी लाईनमध्ये कोणकोणाला स्थान द्यायचं यासह इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिंदेसेनेनं शिवतीर्थावरची तयारी जवळपास पूर्ण केल्याचा चित्र दिसतं


दसरा मेळाव्यासाठी एकाच मैदानावर, एकाच दिवसासाठी दोन अर्ज आल्यास कुणाला मैदान मिळावं याचा उल्लेख महापालिकेच्या परिपत्रकात नाही. मात्र ज्याचा पहिला अर्ज, त्यालाच मैदान मिळणार असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. पण स्थानिक आमदारांचा अर्ज ग्राह्य धरला जातो असा युक्तीवाद शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं पत्र निर्णयाक ठरणार 
का? असा सवाल उपस्थित होतोय.