मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबुतरखान्यावरुन आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. दादरमधील कबुतर खान्यावर पुन्हा ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम सुरू झालं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या निर्देशानंतर या कबुतरखान्यावर या आधीही बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आली होती. पण जैन समूदायाच्या लोकांनी आंदोलन करुन ती ताडपत्री काढली होती. आता पुन्हा एकदा या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात येत आहे. या ठिकाणी चारही बाजूने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
BMC Action OnDadar Kabutar Khana : कबुतरखान्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त
एकीकडे जैन मुनींनी सरकारला सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे दादरच्या कबुतरखाना परिसरातील बंदोबस्तात रविवारी रात्री अचानक वाढ करण्यात आली. कबुतरखाना परिसरात स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दादर स्थानकाजवळील कबुतरखान्याला छावणीचं स्वरूप आलं आहे.
जैन समाजाकडून बुधवारी कबुतरखान्याजवळ मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. पालिकेने लावलेल्या ताडपत्री आंदोलकांनी फाडल्या होत्या. आता पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Jain Community Protest On Dadar Kabutar Khana : जैन मुनींकडून आव्हानाची भाषा
दादरमधील कबुतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. अशातच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट सरकारलाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली. कबुतरखान्याला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना देखील जैन मुनींनी काही प्रश्न विचारलेत. तसंच कबुतर खान्यासंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबुतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी दिला.
Pigeon Feeding Case : कायमस्वरुपी तोडगा निघणार का?
दादरचा कबुतरखाना हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि पर्यायानं राज्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरतोय. त्यातच आता जैनमुनींनी आता शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानं या प्रकरणाला दिवसेंदिवस हिंसक वळण प्राप्त होत चाललंय का असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र यामुळे कबुतरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करताना अनेक अडथळ्यांची शर्यत सरकारला पार करावी लागताना दिसत आहे. त्यामुळे ही अडथळ्यांची शर्यत किती लांबणार आणि कबुतरांवर कायमस्वरुपी तोडगा निघणार की धार्मिक राजकारणापुढे सरकारला नमतं घ्यावं लागणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा: