मुंबई : मुंबई डब्बेवाला संघटनेचे (mumbai dabbawala association) अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक करण्यात आली आहे. डब्बेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ज्याअंतर्गत घाटकोपर पोलिसांकडून तळेकर यांना अटक करण्यात आली.


फेब्रुवारी 2020 मध्ये घाटकोपर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आली होती. मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच ही एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी तळेकर मुंबई डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी होते. तेव्हा त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांची काही कागदपत्र घेतली होती. पण, त्यानंतर डब्बेवाल्यांचा दुचाकी उत्पादक, विक्रेत्या कंपन्यांकडून फोन येऊ लागले. त्यांना पतपेढ्यांकडूनही फोन येऊ लागले.


डब्बेवाल्यांच्या नावे कर्ज काढण्यात आल्यामुळं त्यांना हे फोन येऊ लागले होते. त्यांना कर्जाचे हप्तेही भरावे लागले, त्यामुळे आपली एक प्रकारे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डब्बेवाल्यांनी एकत्रित येत तळेकर आणि आणखी चारजणांविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 420 अन्वये एफआयर करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.


कोरोनामागोमाग देशावर 'बर्ड फ्लू'चं संकट; 'या' राज्यांत सतर्कतेचा इशारा


मागील काही महिन्यांपासून घाटकोपर पोलिस स्थानकाकडून यासंबंधीचा तपास सुरु होता. ज्याअंतर्गत तळेकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.