Mumbai Crime News : तुम्हा आम्हा सर्वांचा वैयक्तिक डेटा (Personal Data) सध्या सुरक्षित नाही. डिजिटलच्या युगात आपला डेटा कितपत सुरक्षित आहे हा मोठा सवालच आहे. मुंबई गुन्हे शाखेनं दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतल्यानंतर आपला डेटा कसा आणि कुठवर पोहोचला आहे याबाबत आपल्या कल्पनेच्या पलिकडील माहिती समोर आली आहे. अवघ्या हजार रुपयांत कोणाचाही वैयक्तिक डेटा उपलब्ध करून देणाऱ्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट सहाने बेड्या ठोकल्या आहेत. 


‘Tracenow.co.in’ आणि ‘Fonivotech.com’ या दोन संकेतस्थळांच्या माध्यमातून निखिल येलीगट्टी आणि राहुल येलीगट्टी हे दोन भाऊ भारतीयांची खाजगी माहिती विकत होते. या दोन संकेतस्थळांचा युजर आयडी आणि पासवर्ड 2 हजार रुपये महिना, 12 हजार रुपये 6 महिने आणि वर्षाचे 24 हजार रुपये घेऊन बँक रिकव्हरी कंपन्या आणि इतर कंपन्यांना देत होते.  


मुलुंडमध्ये राहायला, चेंबूरमध्ये कार्यालय


मुलुंडमध्ये राहणाऱ्या या दोघांचे कार्यालय चेंबूरमध्ये होते. पोलिसांनी या दोघांना पकडण्यासाठी सापळा रचला. या दोन्ही भावांनी या संकेतस्थळाचे युजर आयडी आणि पासवर्ड विकत घेण्यासाठी बोगस ग्राहक तयार केले. एका बँक रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून त्यांच्याकडून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवले. त्यावर लॉगिन करताच पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी मोबाईल क्रमांक टाकले असता अवघ्या एका क्लिकवर या आधारकार्डला लिंक असणारी सर्व माहिती तसेच त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, गावाचा पत्ता, आधारकार्ड  क्रमांक, पॅनकार्ड इत्यादी माहिती आणि सद्यस्थितीत वापरत असलेला मोबाईल क्रमांक आणि कुटुंबाची अचूक माहिती उपलब्ध झाली.


वैयक्तिक आणि खाजगी माहिती कुठेही दिलेली नसताना बेकायदेशीररित्या डेटाची विक्री 


वैयक्तिक आणि खाजगी माहिती कुठेही दिलेली नसताना या संकेतस्थळावर विशिष्ट ऍडमिन युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून ही माहिती बेकायदेशीररित्या विकली जात असल्याचे समोर आले. प्रकरणी गुन्हे शाखेने चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना  केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून या टोळीने अनेक खाजगी कंपन्या तसेच बँक रिकव्हरी एजंट यांनाही भारतीयांची माहिती विकल्याची शक्यता आहे. याचा तपास आता गुन्हे प्रकटीकरण कक्ष करत आहे. 


ही बातमी देखील वाचा


Data Protection Bill : डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा मसुदा जारी, 500 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद