Mumbai Crime : महाराष्ट्रातील नांदेडचे (Nanded) आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या घरातून 25 लाख रुपयांची चोरी (Robbery) झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आमदार शिंदे यांच्या चालकाने (Driver) त्याच्या मित्राच्या मदतीने ही चोरी केली. श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील (Mumbai) घरात चोरीची घटना घडली. इतकंच नाही तर आरोपींनी त्यांच्याकडे 30 लाख रुपयांची खंडणी (Extortion) देखील मागितली आहे. या प्रकरणी एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये (N M Joshi Police Station) गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


आरोपींनी फोन करुन 30 लाख रुपयांची खंडणी मागितली


श्यामसुंदर शिंदे यांचं मुंबईतील लोढा बॅलोसिमो को-ऑप हौसिंग सोसायटीमध्ये घर आहे. त्यांचा चालक चक्रधर पंडित मोरे याने मित्र अभिजीत कदमसह चोरी केली. 1 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान दोघांनी चोरी केली. आमदार शिंदे यांच्या घरातून तब्बल 25 लाख रुपयांची चोरी केली. एवढंच नाही तर फोन करुन श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे 30 लाख रुपयांची मागणी केली. जर 1 जूनपर्यंत पैसे मिळाले नाही तर रायगडला जाऊन स्वत:ला इजा करुन घेईन आणि सोशल मीडियावर तुमची बदनामी करेन, अशी धमकी आरोपीने आमदार शिंदे यांना दिली.


चालक आणि मित्राविरोधात पोलिसात तक्रार


यानंतर श्यामसुंदर शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाने एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये चालक चक्रधर पंडित मोरे आणि त्याचा मित्र अभिजीत कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी चालक आणि त्याच्या मित्राचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


कोण आहेत श्यामसुंदर शिंदे?


श्यामसुंदर शिंदे हे नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे (Loha Kandhar Constituency) आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत लोहा मतदारसंघात शेकापतर्फे निवडून आलेले शिंदे हे या पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. शेकापतर्फे निवडून आल्यावर सुरुवातीला त्यांनी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिलं होतं. नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीसोबत राहिल्यानंतर त्यांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपशी घरोबा केला. 


हेही वाचा


Nanded News : भर व्यासपीठावरच खासदार भावाला बहिणीने सुनावले खडे बोल; व्हिडीओ व्हायरल