Mumbai Crime News मुंबई: नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात शुक्रवारी (09 ऑगस्ट) एक धक्कादायक घटना घडली. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये (Nandigram Express) एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Nandigram Express Murder Case) एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांकडून आता चौकशी सुरु आहे. 


नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का केली, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.


मृत व्यक्ती घाटकोपरमधील रहिवासी-


मृत व्यक्ती मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो त्या प्रकरणात फरार होता. या प्रकरणामुळे मानसिक तणावात असलेल्या मृत व्यक्तीने आपले जीवन संपवले असल्याचा प्राथमिक संशय आहे.


मफलरचा केला वापर-


आरोपीने नांदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात स्वतःला गळफास लावण्यासाठी त्याच्याकडील मफलरचा वापर केल्याचं समोर आलं आहे. दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


काही दिवसांआधी सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह-


मध्य रेल्वेमार्गावरील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये मृतदेह असलेली एक सुटकेस आढळून आली होती. याप्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी अर्शद अली सादीक अली शेख याची हत्या करुन त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये (Dadar Suitcase Murder) भरला होता. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा ही सुटकेस तुतारी एक्स्प्रेसने (Tutari Express) कोकणात घेऊन चालला होता. मात्र, रेल्वे पोलिसांना जय चावडाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली आणि त्यामध्ये रक्ताने माखलेला अर्शदचा मृतदेह आढळून आला. मयत अर्शद अली सादीक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु प्यायला बसले असताना शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादीक शेखचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


संबंधित बातमी:


Dadar Suitcase Dead Body: दादर सुटकेस हत्याप्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी, बायकोचा विषय निघताच तीन मूकबधिरांचं भांडण, अर्शदला मित्रांनीच का मारलं?