मुंबई :  ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षीत वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार  केल्याचा आरोप आहे. आझाद मैदान  पोलिस ठाण्यात एका  सहाय्यक पोलीस निरीक्षकावर महिलेने बलात्काराचा (Mumbai Crime News) गुन्हा दाखल केला आहे.  जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. ऑक्टोबर  2020 साली  सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शिवाजी पार्क परिसरात  बलात्कार केल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. तपासादरम्यान अत्याचार व ब्लॅकमेलिंग करत असल्याचे समोर आले आहे


राज्य दहशतवादविरोधी विभागातील (एटीएस) एपीआय विश्वास पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तपासादरम्यान मदत करणाऱ्या महिलेशी ओळख वाढवून पाटीलने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचे पिडीतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  पुढे याचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू होते. अखेर, पाटीलचे अत्याचार वाढल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.


2019 साली एका तपासादरम्यान झाली होती भेट


हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, 2019 साली विश्वास पाटील एटीएसमध्ये काम करत असताना गुंड रवी पुजारी प्रकरणात काम करत असताना त्यांनी महिलेची आणि पाटीलची भेट झाली. त्यानंतर पाटील यांनी महिलेशी मैत्री वाढवली. त्याने तिला पोलिस खात्याकडून आणखी व्यवसाय देण्याचे आश्वासन दिले. मैत्री वाढत गेल्यानंतर महिलेसमोर त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. तेव्हा पिडीत महिलेने नकार दिला.  त्यावेळी पाटील काम करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या निरीक्षकाकडे तिने याबाबत तक्रार केली. तक्रार केल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार करू नका, असे सांगण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.


कुटुंबाला मारण्याची धमकी देत बलात्कार 


ऑक्टोबर 2020 साली पाटीलने  पीडित महिलेला एका कामासाठी  फोन केला आणि तिला शिवाजी पार्क परिसरात भेटण्यास सांगितले. दादर येथील हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. मात्र, रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढत असल्याने त्यांना बोलता येत नव्हते.  त्यावेळी त्याने तिला शिवाजी पार्क येथील जवळच्या फ्लॅटमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले आणि  तिच्यावर  बलात्कार केल्याचे पिडीतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  त्यानंतर आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. या धमकीचा गैरफायदा घेऊन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटीलने पीडित  महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला असल्याचा आरोप आहे.


हे ही वाचा :


'कुंपणाने'च खाल्ले शेत'! हत्याराच्या धाकात मालकाला लुटले, सांगलीच्या बुधगाव येथील घटना