मुंबई : मुंबई क्राईम ब्रॅंचच्या यूनिट 7 नं एक मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. ज्यामध्ये मॉडल्ससोबत फिल्मी कलाकारांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक दलाल महिलेला अटक केले आहे. तर एका अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सला रेस्क्यू करण्यात आलं आहे. या आधीही सिनेक्षेत्राशी संबंधित व्यक्तिंचा सेक्स रॅकेटमधील सहभाग पोलिसांनी उघडकीस आणला होता. आता या कारवाईने पुन्हा एकदा फिल्म क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका दलाल महिलेला अटक करण्यात आलं आहे.


क्राईम ब्रँचचे डीसीपी अकबर पठाण यांनी एबीपीला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की, मुंबईच्या ईस्टर्न सबर्ब परिसरात एक सेक्स रॅकेट अॅक्टिव्ह आहे आणि त्यात वेश्या व्यवसायासाठी मॉडल्स आणि अभिनेत्रींचा वापर केला जात आहे.


यानंतर पोलिसांनी बोगस ग्राहक बनून दलाल महिलेशी संपर्क साधला. ग्राहक बनलेल्या पोलिसांनी सिनेक्षेत्रातील कलाकार किंवा मॉडेलची मागणी तिच्याकडे केली. आधी या महिलेने काहीच माहित नसल्याचा बनाव केला. मात्र काही दिवसांनी तिला त्यांच्यावर विश्वास बसला. तिनं ग्राहक बनून आलेल्या पोलिसांकडे पैशांची बोलणी सुरु केली. एका रात्रीसाठी 55 हजार रुपयांची मागणी केली. तिचं म्हणणं होतं की, तिच्या संपर्कात अनेक मॉडेल्स आणि कलाकार आहेत.


डील पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेने ग्राहक बनलेल्या पोलिसाला तीन महिला दाखवण्याचं सांगितलं, त्यापैकी कुण्या एकीला निवडायचं होतं. यासाठी तिनं घाटकोपरमधील एक हॉटेलही बुक केलं. तिथं ती त्या तीन महिलांसह आली. यात एक भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध कलाकार आहे तिनं टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे, तर अन्य दोन मॉडेल्स आहेत.


ज्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये ती महिला या अभिनेत्री आणि मुलींना दाखवत होती, त्याचवेळी क्राईम ब्रँचच्या एका टीमने तिथं रेड मारली आणि त्या तीन महिलांना रेस्क्यू केलं. पोलिसांनी दलाल महिलेला अटक केलं आहे. मात्र या पूर्ण रॅकेटच्या मास्टरमाईंडचा पत्ता लागलेला नाही, तो फरार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, अटक केलेल्या महिलेनं सांगितलं की, ती या महिलांकडून 3 टक्के कमिशन घेत होती.