Covid-19 Centres : मुंबईमधील मोठी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे ‘जम्बो सेंटर’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पहिल्या टप्प्यात तीन केंद्रे यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर दुस-या टप्प्यात आता पाच केंद्रे बंद करणार आहेत. मात्र, सेव्हन हिल्स रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत राहणार आहे. वांद्रे - कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. 


कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध आठ ठिकाणी ‘कोविड जम्बो केंद्रे’ कार्यरत होती. या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये 12 हजार 375 रुग्‍णशय्या व 907 अतिदक्षता    रुग्‍णशय्या होत्या. या उपचार केंद्रांच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले. 


 गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसह लक्षणे असणा-या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कोविड रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करण्याचे निश्चित केले. यानुसार पहिल्या टप्प्यात तीन ‘कोविड जम्बो केअर सेंटर’ बंद केली. तर आता दुस-या टप्प्यात आणखी पाच केंद्रे बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, कोरोनाची लागण झाल्यास संबंधित रुग्णांना वेळच्यावेळी योग्य उपचार मिळावेत, या हेतूने सेव्हन हिल्स रुग्णालयासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत असणार आहे


पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को – गोरेगांव आणि कांजूरमार्ग येथील ‘जम्बो कोविड केअर सेंटर’ बंद करण्यात आली आहेत. तर आता दुस-या टप्प्यात वांद्रे - कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, या ठिकाणी कार्यरत असणारी लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत. ज्यामुळे, लसीकरणाबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही.