Mumbai: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची मुख्यमंत्री सचिवालयात पुनुरुज्जीवीत करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्प वार रुमच्या महासंचालकपदी नियुकी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी त्यांच्या नियुकीचे आदेश जारी केले. मोपलवार यांची नियुक्ती महासंचालकपदी रुजू झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचे पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
राज्यात सुरु असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजनाबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात वार रूमचे पुनुरुज्जीवन करण्यात आले आहे. या वार रूमचे प्रमुख म्हणून मोपलवार हे काम पाहतील. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून बैठक व्यवस्था आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेशात म्हटले आहे.
राधेश्याम मोपलवार हे 28 फेब्रुवारी 2018 रोजी शासन सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांना लगेच राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना आतापर्यंत सलग आठवेळा मुदतवाढ मिळाली आहे. फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये विक्रमी मुदतवाढ मिळालेले मोपलवार हे पहिलेच अधिकारी असावेत.
मुंबई- नागपूरला जलदगतीने जोडणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. फडणवीस सरकारमध्ये समृद्धीचे काम एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. तेव्हापासून मोपलवार हे शिंदे यांच्या गुडबुक होते. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोपलवार यांना मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. त्यानुसार त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या राज्यात समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प,बुलेट ट्रेन तसेच अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांना गती देण्याचे काम मोपलवार यांना करावे लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 2138 कोरोना रुग्णांची नोंद तर 2269 कोरोनामुक्त
Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा मोठा राजकीय निर्णय, उद्धव ठाकरेंना भेटून शिवबंधन बांधणार
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजार देणार, जाणून घ्या मंत्रिमंडळातील 13 महत्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती