मुंबई : तिस-या लाटेच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंबईतल्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. दररोज 1 लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य असलेल्या मुंबई महापालिकेवर आज लससाठा नसल्यानं लसीकरण बंद करण्याची नामुष्की आली आहे. लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महानगपालिकेने दिली आहे.
मुंबईकरांनो, "आम्ही सूचित करू इच्छितो की 1 जुलैला बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही.
आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.", अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
गेले काही दिवस सुसाट सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक लागलाय. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने आज शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रे बंद आहेत. मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दररोज सरासरी एक लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, हे लक्ष्य कागदोपत्री राहिले आहे.
गेल्या सोमवारी आतापर्यंतचे सर्वाधिक एक लाख 80 हजार नागरिकांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत 53 लाखांहून अधिक लोकांना लस मिळाली आहे. मात्र केंद्राकडून मिळणाऱ्या लसींचा साठा मर्यादित स्वरूपात असल्याने पुन्हा एकदा या मोहिमेला फटका बसला आहे.
मुंबईला सध्या लस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने जागतिक स्तरावर निविदा मागून एक कोटी लस खरेदी करण्याची प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयोग गुंडाळून ठेवायला लागला. स्पुतनिक या लसीचे भारतातील वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीबरोबर पालिकेची गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे केंद्राकडून राज्याकडे आणि राज्याकडून महापालिकांकडे येणा-या लससाठ्याकडे डोळे लावून बसण्यापलीकडे नागरिकांच्या हातात काहीच राहिले नाही.