मुंबई : विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून विचारला आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्यपालांना तारीख ठरवणं बंधनकारक असतं, अशी माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना निवड प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.


डॉ. अनंत कळते म्हणाले की, "विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपालांना तारीख ठरवणं बंधनकारक असतं. राज्यपाल निवडणुकीची तारीख देतील त्याच्या आदल्या दिवशी अनुमोदक आणि अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला पाहिजे. शक्यतो सात दिवस आधी सदस्यांना कळवणं महत्त्वाचं असतं, मात्र त्यात बदलही करता येतो."


राज्यपालांनी सहा ही तारीख दिली तर पाच तारखेला फॉर्म भरुन प्रक्रिया पार पाडता येईल. विधानसभा अध्यक्षांची निवड नियम 6/3 प्रमाणे गुप्त प्रमाणे घेता येते. सर्व आमदारांना दोन तासांची वेळ मतदानासाठी दिली जाते. दोन पेक्षा जास्त उमेदवार आले तर ज्याला कमी मत आहेत त्यांना वगळून पुन्हा दोघांमध्ये निवडणूक होईल." 


दोन दिवसांच्या अधिवेशनात निवडणूक घेणे शक्य पण... : डॉ. कळसे
डॉ. अनंत कळसे म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध आणि एकमताने झालेली आहे. जर सभागृहाने निर्णय घेतला तर आवाजी पद्धतीने ही निवडणूक होऊ शकते. नियमांमध्ये काही बदल करावा लागेल. ऑनलाईन पद्धतीने किंवा बॅलेट पद्धतीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. मात्र कोविड संसर्गजन्य परिस्थितीमध्ये याचाही विचार केला जावा, असं मला वाटतं. दोन दिवसांच्या अधिवेशनात निवडणूक घेणे शक्य आहे मात्र त्यासाठी अनेक नियम सस्पेंड करावे लागतील."


अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडावा का? या विचारात ठाकरे सरकार असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिलं आहे. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. राज्यपालांनी 24 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात महत्वाच्या तीन मुद्दयावर लक्ष वेधलं आहे. यामध्ये त्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी प्रमुख मागणी देखील केली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 5 आणि 6 जुलै रोजी होत असून, हा कालावधी वाढवावा अशी मागणी राज्यपालांनी केली आहे. तसंच दुसरा महत्वाचा मुद्दा राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटला आहे तो म्हणजे विधानसभा अध्यक्षपद लवकरात लवकर भरावं. तर तिसरा मुद्दा ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्यामुळे या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊ नये, असं राज्यपाल म्हणाले. 


विधानसभा अध्यक्षपदाची जागा काँग्रेसची : शरद पवार
विधानसभा अध्यक्षपदाची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे निवडणूक घेण्याबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.