मुंबई : मुंबईत कोरोनाच्या 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 60 वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता कोविड 19 पॉझिटिव्ह आणि लक्षणे आढळलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांवर महापालिका, राज्य सरकार व खासगी मोठ्या रुग्णालयातच उपचार केले जाणार आहेत. 60 वर्षांखालील आणि लक्षणे नसलेल्या इतर रुग्णांवर मात्र मॅटरनिटी होम, गेस्ट हाऊस, हॉल आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

Coronavirus | मुंबईतील 3 दिवसांच्या बाळासह आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबईमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 278 झाला असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे 60 वर्षांवरील असून या रुग्णांना इतरही आजार असल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेता यावी म्हणून सर्व सोयी असलेल्या कस्तुरबा, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल, नानावटी, सैफी या रुग्णालयातच या रुग्णांवर उपचार करण्याचे या एसओपीमध्ये सांगण्यात आले आहे.

60 वर्षाखालील आणि ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत अशा रूग्णांवर मॅटरनिटी होम बिल्डिंग नागपाडा, लिलावती हॉस्पिटलजवळचे मॅटरनिटी होम, अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस, डायग्नोस्टिक सेंटर पंजाबी गल्ली, एमसीएमसीआर पवई, अर्बन हेल्थ सेंटर शिवाजी नगर, वांद्रे तलावासमोरील महात्मा गांधी हॉल या ठिकाणी उपचाराकरिता विलगीकरण (आयसोलेशन) सुविधा सुरू करण्यात येणार आहे.