Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मुंबईत 602 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी 490 रुग्णांची नोंद झाली होती. 21 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी मुंबईत 327 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तीन दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोना फोफावतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णाचा स्फोट होईल, असेही सांगितले जातेय. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईमध्ये 602 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत सात लाख 46 हजार 991 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. मुंबईत दोन हजार 813 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुपटीचा दर 1747 दिवस इतका झालाय. 16 डिसेंबर ते 22 डिसेंबरदरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णाचा दर 0.04 टक्के इतका झालाय.
राज्यात 1179 नव्या कोरोनाबाधितांची भर
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज 23 ओमायक्रॉनबाधितांची नोंद -
राज्यात आज 23 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 88 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 42 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.