मुंबई : 'ए बाळा, मास्क लाव ना रे, शो ला ठेवलास का?' 'ओ दादा मास्क लावा, नाहीतर फाईन भरावा लागेल.' 'जर तुमच्यासारखे वकीलच असे वागत असतील तर कसं चालेल?' या सूचना आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा ते सीएसएमटी प्रवास करुन स्टेशनची पाहणी केली. लोकल ट्रेन तसंच प्लॅटफॉर्मवर जे लोक मास्क न घालता फिरताना दिसले त्यांना महापौरांनी कडक कारवाईचा इशारा दिला. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महापौरांनी आज भायखळा ते सीएसएमटी असा प्रवास केला. यावेळी त्यांनी सगळ्यांना कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. तसंच गरज पडेल तिथे अनेकांना कडक शब्दात सुनावत कारवाईचा इशाराही दिला. तर काहींना हात जोडून मास्क घालण्याची विनंती केली.
या कारवाईदरम्यान किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "महापौर हे पदच लोकांसाठी आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. मास्क नसेल तर दिला पाहिजे. मुंबईकरांनी आतापर्यंत चांगली साथ दिली, यापुढेही देतील. जे काही दहा टक्के लोक आहेत, जे वेगवेगळे प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांना उत्तर देणं गरजेचं नाही. आपण कामातून उत्तर देऊ. आता वाढणारा कोरोना रोखायचा असेल तर मास्क वापरणं गरजेचं आहे आणि तो नाकावर असणं अनिवार्य आहे."
10 टक्के बेजबाबदार लोक 90 लोकांना अडचणीत आणत आहेत : महापौर
या कारवाईदरम्यान काय पाहायला मिळालं याविषयी सांगताना महापौर म्हणाल्या की, "30 ते 40 जणांमधील 30 जणांनी व्यवस्थित मास्क लावला होता. दहामध्ये चार तरुण मुलं होती. उरलेले वयोवृद्ध होते, त्यांनी मास्क लावला नव्हता. त्यांना मास्क खरेदी करण्यासाठी आमच्या खिशातून पैसे दिले. हे दहा टक्के बेजबाबदार लोक 90 लोकांना अडचणीत आणत आहेत. पण त्यांनी असं करु नये."
मला घरात राहून चालणार नाही : किशोरी पेडणेकर
लोकांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. अडाणी लोक मास्क लावत आहेत पण सुशिक्षित लोक मास्क लावताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री काम करत आहेत. महापौर म्हणून लोकांमध्ये जाऊन मला काम करायला हवं. कोविड 19 वाढत असताना मला घरात राहून चालणार नाही. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार दोन्ही मिळून काम करत आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.