Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे. आज मुंबईत 871 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी  445  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,06,933 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,663 झाली आहे. सध्या मुंबईत 3,243 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 852 रुग्णांमध्ये 831 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1898 दिवसांवर गेला आहे.






सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये 4243 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 2342 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1270 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात एकूण 11856 सक्रिय रुग्ण आहेत.


 राज्यात शुक्रवारी 1975 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात आज 1975 कोरोनाच्या   नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1904  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,08,195 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण 11856 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4243  इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये 2343   सक्रिय रुग्ण आहेत.