मुंबई : ऑनलाईन लूट करणाऱ्या सायबर ठकसेनला पकडणारे पोलिस आता स्वत:च या चोरीचे बळी ठरले आहेत. मुंबई पोलिसातील एक, दोन नव्हे तर अनेक कर्मचाऱ्यांचे पगार लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचे सॅलरी अकाऊंट हॅक करुन पैसे काढले आहेत.

मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्यांचे पगार अॅक्सिस बँकेत जमा होतात. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी मोबाईलमध्ये पगार जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर पोलिसांचा चेहरा खुलला. पण काही तासांनंतर अनेकांच्या मोबाईलमध्ये अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला. पण एटीएममधून स्वत: पैसे न काढताही हा मेसेज आल्याने त्यांची चिंता वाढली.

काहींच्या अकाऊंटमधून 20 हजार तर काहींच्या अकाऊंटमधून 25 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली होती.

आतापर्यंत माटुंगा, डीबी मार्ग, कफ परेड या पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

ज्या पोलिसांच्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत, त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांचे अकाऊंट अॅक्सिस बँकेच्या दादर शाखेत आहेत. या शाखेत हजारो पोलिसांची खाती आहेत.

याबाबत अॅक्सिस बँकेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, बँकेने यावर बोलण्यास नकार दिला.

अॅक्सिस बँकेतील मुंबई पोलिसांचं सॅलरी अकाऊंट हॅक करुन पैसे काढल्याची ही पहिली घटना नाही. याआधी 2013 मध्ये सुमारे 15 पोलिसांच्या अॅक्सिस बँक अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले होते.