मुंबई : काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या निवडीवरुन घमासान सुरु असल्याची माहिती आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या इच्छेला काँग्रेसच्या निवड समितीने सुरुंग लावला. निरुपम यांना 'उत्तर पश्चिम मुंबई' ऐवजी 'उत्तर मुंबई' या लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसचे दिवंगत गुरुदास कामत यांच्या 'उत्तर पश्चिम मुंबई' या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संजय निरुपम यांची इच्छा होती. मात्र काँग्रेसच्या निवड समितीने निरुपम यांनी 'उत्तर मुंबई' मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, अशा सूचना केल्याची माहिती आहे.

लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार


मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी मतदारसंघ बदलला, तर प्रचारकाळात चांगला संदेश जाणार नाही, असा सूर लावत निवड समितीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी निरुपम यांना गप्प बसवण्यात आलं. काँग्रेस नेत्यांनी जुने मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवू नका, अशा सूचना खुद्द दिल्ली हायकमांडनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे, मुंबईतील लोकसभेच्या मतदारसंघांपैकी दक्षिण मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी उमेदवारीवरुन पुढील काळात तणाव वाढण्याची चिन्हं आहेत. प्रिया दत्त यांच्या 'उत्तर मध्य मुंबई' मतदारसंघात बाबा सिद्दीकी, राज ब्बबर यांच्या नावाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तर नगमा यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

'दक्षिण मध्य मुंबई' लोकसभा मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांच्यासह भालचंद्र मुणगेकर यांच्याही नावाची शिफारस दिल्लीकडे होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून कृपाशंकर सिंग यांना निवडणूक लढवण्यास विरोध असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.