या सिनेमाने सोमवारी म्हणजे चौथ्या दिवशी 5.10 कोटींची कमाई केली आहे, अशी माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारच्या कमाईमध्ये चांगलीच घसरण झाली आहे. मात्र वर्किंग डे असल्याने ही कमाई चांगली असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे.
या सिनेमाने पहिल्या दिवशी 8.75 कोटींची कमाई केली होती. तर शनिवारी 18.10 कोटी रविवारी 15.70 कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाची चार दिवसाची एकूण कमाई 47.65 कोटी इतकी झाली आहे. तरण आदर्श यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तीरेखा कंगना रनौत हिने साकारली असून दिग्दर्शनही तिनेच केलं आहे. या सिनेमात कंगनासह अंकिता लोखंडे, डॅनी डेंग्जोंगपा आणि सुरेश ओेबेरॉय मुख्य भूमिकेत आहे.
सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांचे एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत संबंध दाखवण्यात आल्याच्या काही बातम्या आल्यानंतर करणी सेनेनं या सिनेमाला विरोध केला होता. रिलीज करण्यापूर्वी चित्रपट करणी सेनेला दाखवण्यात यावा, अन्यथा हा सिनेमा चित्रपटगृहात चालू देणार नाही, अशी भूमिका करणी सेनेनं घेतली होती. तर सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत विवेक तांबे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
मात्र या सगळ्या वादानंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.