डीजेवाल्यांना राज ठाकरेंचं समर्थन
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2018 03:55 PM (IST)
गणेशोत्सव मंडळांची सहमती असेल तर खुशाल डीजे वाजवा, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
मुंबई : गणेशोत्सव मंडळांची सहमती असेल तर खुशाल डीजे वाजवा, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. आज मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले. डीजे बंदीचं प्रकरण कोर्टात असल्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, मात्र मंडळ जर तयार असतील. तर डीजे वाजवा, असं राज ठाकरे म्हटल्याचं डीजे मालकांनी सांगितलं. ऐन सणासुदीच्या काळात ही बंदी घातल्याने आमच्यावर उपसमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असा आग्रह डीजे मालकांचा आहे. 14 सप्टेंबर रोजी हायकोर्टात काय झालं? सण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करुन पाठ फिरवू शकत नाही, असे मुंबई हायकोर्टाने डीजेसंदर्भात सुनावणीत 14 सप्टेंबर रोजी म्हटले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी नाहीच. मात्र, साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य?, असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सवाल केला आहे. राज्य सरकारने यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला असून, 19 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.