नवी दिल्ली : लोकसभा आणि देशभरातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील बहुतांश पक्षांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु एक देश एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. परंतु 'एक देश एक निवडणुकी'बाबत काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे.


काँग्रेसने 'एक देश एक निवडणुकी'बाबत म्हटले होते की, सरकारला निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यासाठी कोणतीही पावलं उचलायची असतील, तर त्यांनी संसदेत या विषयावर चर्चा करायला हवी. परंतु मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी याबाबत वेगळे मत मांडले आहे. देवरा यांनी एक देश एक निवडणुकीचे समर्थन केले आहे. तसेच याविषयी चर्चा व्हायला हवी, असेही मत मांडले आहे.

देवरा यांनी म्हटले आहे की, "केंद्र सरकारने मांडलेली 'एक राष्ट्र एक निवडणूक' ही संकल्पना विचार आणि चर्चा करण्यायोग्य आहे. 1967 पर्यंत आपल्या देशात अशाच प्रकारे निवडणूक होत होती. ही गोष्ट आपण विसरुन चालणार नाही. मी एक माजी खासदार आहे, मी आतापर्यंत चार वेळा निवडणूक लढली आहे. त्यामुळे मला माहित आहे की, सातत्याने देशभरात निवडणुका होत असल्यामुळे चांगल्या प्रशासनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे 'एक राष्ट्र एक निवडणूक' ही संकल्पना चर्चा करण्यायोग्य आहे."

दरम्यान, मोदींनी बोलावलेल्या या सर्वपक्षीय बैठकीवर काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार घातला. ममता बॅनर्जी यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. त्यासोबतच तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू, बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव या बैठकीला अनुपस्थित होते.

'एक देश एक निवडणुकी'ला बहुतांश पक्षांचे समर्थन, सर्व पक्षांशी चर्चेसाठी सरकार समिती स्थापन करणार : राजनाथ सिंह

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, सीपीआयचे सीताराम येचुरी आणि सुधाकर रेड्डी, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यासह रामविलास पासवान आणि फारुक अब्दुल्ला उपस्थित होते. तर सरकारकडून मोदींसह गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

व्हिडीओ पाहा