Continues below advertisement


मुंबई : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वासात न घेता मनसेसोबत वेगळी चूल मांडल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी दिसते. त्यामुळेच काँग्रेसने 'एकला चलो रे'चा नाराही दिला होता. त्यामुळे एकीकडे मनसेसोबत युतीची चर्चा करत असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


काँग्रेसने या आधीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस स्वबळाचा पुनर्विचार करेल, मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असतील अशी सूत्रांची माहिती आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे. मात्र मनसेच्या समावेशावरुन माघार न घेण्यावर काँग्रेस ठाम असल्याची माहिती आहे. तर मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे इतर लोक काय म्हणतात याच्याशी आमचं घेणंदेणं नाही, आमचे निर्णय राज ठाकरे घेतील असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. 



Sharad Pawar On MNS : मनसेबाबत शरद पवार सकारात्मक


मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची फाटाफूट रोखण्यासाठी आता पवार अॅक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी असं शरद पवारांचं मत आहे अशी माहिती एबीपी माझाला राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे.


मतदार यादी घोळासंदर्भात आणि मतचोरी संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? असं पवारांचं मत आहे असं समजतंय. महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात शरद पवार सकारात्मक आहेत अशी माहिती राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.


मुंबई महापालिकेसंदर्भात काँग्रेसची सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या काँग्रेसबाबतच्या भूमिकेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.


Congress On BMC Election : काँग्रेस लहान पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत


एकीकडे शरद पवार मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास सकारात्मक असताना दुसरीकडे राज ठाकरेंसोबत न जाण्यावर काँग्रेस मात्र ठाम आहे. समविचारी पक्षांनाच सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याची भूमिका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे. तसंच रिपाइंचे घटक पक्षही सोबत येण्यास तयार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.