मुंबई: घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डरला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. 'मिड डे' या दैनिकाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

साई निनाद एण्टरप्रायजेसचे अमित पालशेतकर असं या बिल्डरचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरातील चंद्रप्रकाश सिंह यांनी, दोन नव्या घरांसाठी 2010 मध्येच बिल्डरला पैसे दिले होते. या घराचा ताबा 2013 मध्ये मिळणं अपेक्षित होतं. मात्र बिल्डरने घराचा ताबा आज देतो, उद्या असं म्हणत अनेक वर्ष टोलवा-टोलवी केली.

त्यामुळे चंद्रप्रकाश सिंह यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली.

आयोगाने सिंह यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. त्यानंतर बिल्डर अमित पालशेतकर यांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.

रेल्वे कर्मचारी असलेल्या चंद्रप्रकाश सिंह यांनी 2010 मध्ये निवृत्तीनंतर नवघरमध्ये दोन घरं बुक केली होती.

या दोन्ही घरांच्या किमती 42.52 लाख रुपये होती. त्यावेळी सिंह यांनी टू बीएचके घरासाठी 11.40 लाख तर 1बीएचके घरासाठी 7.50 लाख रुपये भरले होते. 

घराचा ताबा 2013 पर्यंत मिळणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही हा गृहपकल्प पूर्ण झालेलाच नाही. त्यामुळे सिंह यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.