Mumbai Mahanagarpalika News: मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात सुशोभीकरण विषयक आढावा बैठक पार पडली. मुंबईच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या अनधिकृत फलक अन् पोस्टर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसी क्षेत्रात विविध ठिकाणी सुशोभीकरण कार्यवाही करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.  26 जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत सध्या विविध 52 ठिकाणी दवाखाने आणखी 50 ने वाढवून 102 करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आज एका विशेष बैठकीचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले होते. 


या बैठकीत खालील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली...


१. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची सातत्याने अधिकाधिक प्रभावी साफसफाई करण्याचे निर्देश. 


२. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या 500 ठिकाणी सुशोभीकरणाची कामे नियोजित आहेत व प्रगतिपथावर आहेत, त्या सर्व ठिकाणी पथदिवे व प्रकाशयोजना अधिक प्रभावी करण्याचे निर्देश.


३. बृहन्मुंबई महानगरपालिका अखत्यारितील पुलांची अधिक प्रभावी साफसफाई करण्यासह तेथे आकर्षक रंगरंगोटी करण्याचे निर्देश. तसेच याच पद्धतीने वाहतूक बेटांचेही सुशोभकरण करण्याचे निर्देश. 
 
४. येत्या २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुशोभीकरण कार्यवाही करण्याचे निर्देश.


५. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत सध्या विविध 52 ठिकाणी दवाखाने मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत आहेत. ही संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत आणखी ५० ने वाढवून १०२ करण्याचे निर्देश.
  
६. प्रत्येक विभागामध्ये सलग २४ तास कार्यरत असणारे शौचालय कार्यान्वित करण्याचे निर्दश. त्याचबरोबर शौचालयांची नियमितपणे व योग्यप्रकारे साफसफाई करण्याचे निर्देश.


७. अति धोकादायक वर्गवारीत समाविष्ट झालेल्या अगर होणा-या शौचालयांचे पुनर्बांधकाम करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश.  


८. प्रत्येक विभागातील किमान एका ठिकाणी हायमास्ट दिवा बसविण्याचे निर्देश. या प्रकारचा दिवा बसविताना ज्या ठिकाणी अधिक प्रकाशाची गरज आहे, अशा ठिकाणाचे निर्धारण सुयोग्यप्रकारे करण्याचेही निर्देश. 


९. अनधिकृत फलक, पोस्टर्स हे सुशोभीत मुंबईच्या सौंदर्यात बाधा आणतात, ही बाब देखील लक्षात घेऊन अनधिकृत फलक व पोस्टर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश. 


१०. ज्या ठिकाणी रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याची कामे सुरु आहेत अगर लवकरच हाती घेतली जाणार आहेत, त्या सर्व ठिकाणांबाबत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून कामे करण्याचे निर्देश. जेणेकरुन, सदर रस्त्यांवरील वाहतूक शक्य तेवढ्या सुरळीतपणे सुरु राहील.