भिवंडी : भिवंडी शहरातील कोरोनाचे बनावट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून अवघ्या 500 रुपयात विकणाऱ्या पॅथेलॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुवारी गुन्हे शाखेने सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात माहिती दिली आहे.
भिवंडी शहरातील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांची कोरोना आरटीपीसीआर तपासणी न करता 500 रुपयांमध्ये हवा तो रिपोर्ट दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी येथे डमी व्यक्तीला कोविड 19 चे निगेटीव्ह रिपोर्ट घेण्यासाठी पाठवले. त्यावेळी आरटीपीसीआर तपासणी करीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोविड 19 चा निगेटीव्ह रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून देताना महेफुज क्लिनीकल लॅबरॉटरी मधील तीन व्यक्तींना रंगेहात पकडले.
यावेळी महेफुज क्लिनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता कोवीड 19 या साथीच्या आजाराचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण 64 व्यक्तींचे रिपोर्ट मिळाले आहेत. त्यामध्ये 59 रिपोर्ट हे निगेटीव्ह व 5 रिपोर्ट हे पॉझिटीव्ह मिळून आले. या बनावट रिपोर्ट बनविल्या प्रकरणी लॅब टेक्नीशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खानकडे विचारपूस केली. त्यावेळी त्याने सदरचे 64 व्यक्तींचे कोविड 19 आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट हे लॅबमध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या सहाय्याने तयार केले असल्याची कबुली दिली.
भिवंडी शहरातुन परराज्यामध्ये जाण्यासाठी विमानाने, रेल्वेने प्रवास करण्याकरीता आणि विविध कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट हा निगेटीव्ह असणे बंधनकारक आहे. हा रिपोर्ट कमीत कमी 500 रुपयांना विकला जात होता. यापुर्वी देखील अनेक लोकांना बनावट रिपोर्ट बनवुन दिलेले आहेत. हे सर्व रिपोर्ट हे मेहफुज क्लिनिकल लॅबरोटरीचे मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार करुन दिले असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे कलम 420, 465, 468, 471, 269, 270, 34 सह कोविड 19 उपाययोजना सन 2020 नियम 11 प्रमाणे साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 2, 3, 4 प्रमाणे बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यात इनामुलहक उर्फ रब्बनी अनवारूल हक सैयद (वय 31, रा. भिवंडी) अफताब आलम मुजीबुल्ला खान (वय 22 रा. पिराणीपाडा) व मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख (वय 20 वर्षे रा. शांतीनगर) या तिघांना बुधवारी अटक करण्यात आली. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या बनावट रिपोर्ट प्रकरणी चौथा आरोपी मेहफुज आलम मुजीबुल्ला खान (वय 29 वर्षे रा. भिवंडी) यास गुरुवारी अटक करण्यात आलेली आहे.