मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज तिसऱ्याही दिवशी सुरुच असल्याने मुंबईकरांचे तिसऱ्या दिवशीही हाल सुरु आहेत. कर्मचारी संपावर ठाम असल्याने मुंबईत बस डेपोमधून एकही गाडी बाहेर पडलेली नाही. बेस्ट संपाबाबत बैठकीचं सत्र सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात बैठका झाल्या, त्या निष्फळ ठरल्या. परिणामी आजही मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. आजही सकाळी 9 वाजता बेस्ट भवनवर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये बेस्ट कामगांर कृती समितीच्या अंतर्गत वेगवेगळ्या सात संघटनांचे पदाधिकारी प्रशासनाशी चर्चा करतील. बेस्ट कृती समिती अंतर्गत शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन, नारायण राणेंची संघटना, काँग्रेस आणि इतर लहान मोठ्या संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का हे पाहावं लागेल. बेस्ट कामगारांच्या या सर्व संघटनांनी मिळून शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेला एकटं पाडलं आहे. संपातून केवळ शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेनेच माघार घेतली आहे. संपात फूट पाडल्यामुळे इतर संघटनांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. संप चिघळला दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चिघळला आहे. बेस्ट प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्माअंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामगारांना संपातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने त्यांना बेस्ट वसाहतीतील घरं रिकामी करण्याची नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: बेस्ट संपात लक्ष घालणार आहेत. उद्या दौऱ्यावरुन आल्यावर बेस्ट संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेणार आहेत. शिवाय कनिष्ठ कामगार श्रेणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहे. कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांना समान श्रेणी, समान वेतन देण्यात येईल, अशी चर्चा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी झाल्याचं त्यांनी सांगितलं. बेस्ट कामगारांच्या कुटुंबीयांचा वडाळा डेपोवर मोर्चा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आज सकाळी अकरा वाजता वडाळा डेपोवर थाळी मोर्चा काढणार आहेत. मेस्माअंतर्गत कारवाई करुन काल बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना परळ, वरळी, भोईवाडा इथल्या बेस्ट कर्मचारी वसाहतीतील घरं रिकामी करण्यास सांगितलं होतं. या कारवाईविरोधात बेस्ट कर्मचारी आणि कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस आणि मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसंच प्रवाशांकडून अधिक भाडे वसूल करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि अन्य खासगी वाहन चालकांवर कारवाईसाठी परिवहन विभागाकडून विशेष पथक रस्त्यांवर उतरवण्यात आलं आहे. बेस्टची वीज गुल होणार? बेस्ट संपामुळे मुंबई शहरात बेस्ट वीजपुरवठ्याची बत्ती गुल होण्याची शक्यता आहे. संपाबाबत आज तोडगा निघाला नाही, तर विद्युत पुरवठा कर्मचारी, विद्युत पुरवठा विभागातील स्ट्रीट लाईट पाहणी, दुरुस्ती करणारा कर्मचारी वर्गही आज संध्याकाळपासून संपावर जाणार आहे. बेस्टचं कार्यालयीन/प्रशासकीय कामकाज करणारा क्लर्क स्टाफही संपावर जाणार असल्याचं कळतं. प्रत्येक डेपोमध्ये साधारण 50-70 क्लरिकल स्टाफ असतो. त्यामुळे 1000 ते 1200 क्लर्क पदावरचे कर्मचारीही आजपासून संपावर जाणार आहे. संबंधित बातम्या बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच बेस्टचा संप : टॅक्सीचालकांची मुजोरी, एसटी मुंबईकरांच्या मदतीला मुंबईत बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर, बस वाहतूक ठप्प