मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवसात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बोनस जाहीर न झाल्यामुळे भाऊबीजेला म्हणजेच शनिवारी 21 ऑक्टोबरला बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.


रक्षाबंधनप्रमाणचे भाऊबीजेलाही  बेस्ट बसेस रस्त्यावर धावणार नाहीत. त्यामुळे सणासुदीला बहिण-भावांकडे जाताना मुंबईकरांचे हाल होण्याची चिन्हं आहेत.

21 ऑक्टोबरला बेस्टच्या बसेस संपूर्णत: बंद राहणार आहेत. बेस्टचे 32 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे बेस्टच्या 3800 बसपैकी एकही बस रस्त्यावर धावणार नाही. 30 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. बोनस जाहीर न झाल्यास 18 तारखेपासून 21 पर्यंत ऐन दिवाळीतच बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते उपोषणाला बसणार आहेत.