Mumbai BEST Bus :  मुंबईकरांना प्रवासासाठी रेल्वेनंतर बेस्ट बस (BEST Bus) ही सर्वात किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. त्यामुळे बेस्ट बसला मुंबईची दुसरी लाइफलाइन असे म्हणतात. बेस्ट बसमधून प्रवास करताना काहीजण आपल्या वस्तू विसरतात. काहीजण तर मोबाईलदेखील (Mobile Phone) विसरतात. काहींना मोबाईल पुन्हा मिळतात. तर, काही जण मोबाईल पुन्हा मिळवण्याच्या अपेक्षा सोडून देतात. बेस्ट बसमध्ये मोबाईल विसरलेल्या प्रवाशांना बेस्ट प्रशासनाने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 


जानेवारी 2023 मध्ये बेस्ट बसमध्ये सापडलेले मोबाईल पुन्हा प्रवाशांना देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. बेस्ट बसमध्ये जानेवारी 2023 महिन्यात गहाळ झालेल्या व बेस्ट कडे जमा झालेल्या भ्रमणध्वनी संचाची (Mobile phone ) यादी गहाळ वस्तू विभाग, संपर्काची अधिक माहिती  बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बेस्ट बसमध्ये 30 डिसेंबर 2022 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत जवळपास 40 मोबाईल फोन मिळाले आहेत. प्रवाशांनी या मोबाईलवर 15 मार्च 2023 पूर्वी दावे करावेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  







आयफोनचा ही समावेश 


विविध बसमार्गांवर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये प्रवाशी मोबाईल विसरले आहेत. यामध्ये आयफोनचाही समावेश आहे. जवळपास तीन आयफोन बेस्टच्या ताब्यात आहे. बस गाड्यांमधील बहुतांशी मोबाईल फोन हे अॅण्ड्राईड फोन आहेत. 



मोबाईल फोनवर दावा करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक


>> मोबाईलवर दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे: 


> ओळखपत्र आणि निवासी पत्ता पुरावा उदा. आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.


> कॅश मेमो / मोबाईलचे बिल


> सीम कार्ड तपशील


> मोबाईल हरवल्याबाबत पोलीस तक्राराची प्रत



कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतरच दावेदाराला मोबाईल दिला जाईल असेही बेस्टने प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


> मौल्यवान वस्तू (म्हणजे सोने, चांदी, मोती, मोती, हिरे)  यावर दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे


> ओळखपत्र आणि निवासी पत्ता पुरावा (उदा. आधार कार्ड, निवडणूक कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.) 


>  पोलीस N.C. / F.I.R. किंवा


> कॅश मेमो / संबंधित वस्तूंचे बिल