धावत्या ट्रेनच्या शौचालयात प्रसुती, ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2017 09:09 AM (IST)
मुंबई : धावत्या ट्रेनच्या शौचालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला. आश्चर्याची बाब म्हणजे धावत्या ट्रेनच्या शौचालयातून ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित आहे. रत्नागिरीहून दादरला येणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली. चंदना शाह या 26 वर्षीय महिलेने शौचालयात मुलाला जन्म दिला. चंदना शाह मूळची पश्चिम बंगालची आहे. मात्र, नुकतंच जन्माला आलेलं हे बाळ कुसा स्टेशनजवळ चालत्या ट्रेनच्या शौचालयामधून थेट ट्रॅकवर पडलं. यानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने ट्रेन तात्काळ थांबवून बाळाला ट्रॅकवरुन उचललं. त्यानंतर कुसा गावचे रहिवासी, रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने बाळाला आणि आईला रुग्णालयात दाखल केलं. दोघेही सुखरुप असल्याचं रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं.