मुंबईतील 1 लाख 4 हजार रिक्षाचालकांचा आज संप
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 02:08 AM (IST)
मुंबई : मुंबईकर चाकरमान्यांसाठी आजचा दिवस कटकटीचा ठरणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मिळून तब्बल एक लाखांहून अधिक रिक्षाचालकांनी आज बंद पुकारला आहे. ओला, उबरसारख्या खाजगी कॅब सेवांवर कडक निर्बंध घालून त्यांच्यावर ताबडतोब बंदी घालावी आणि इतरही खाजगी अनधिकृत कॅब सेवांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई ऑटोमेन्स युनियनने आज एकदिवसीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये 1 लाख 4 हजार ऑटोरिक्षा चालक सहभागी होणार असल्याचा संघटनेचा दावा आहे. गणेशोत्सवापर्यंत सरकार ओला, उबर सेवांबाबत कठोर आणि ठोस निर्णय घेणार नसेल तर त्यानंतर बेमुदत संपाचं हत्यार उपसण्याचा इशाराही मुंबई ऑटोमेन्स संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.