मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवनाचा वाद चिघळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुपचूप पुनर्विकासाची घोषणा का केली? जिथे दोन मजल्यापेक्षा अधिक बांधकाम करण्यास मनाई आहे, तिथे 17 मजल्याची इमारत कशी उभी राहणार आहे, असा सवाल करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

 

विधानसभेत आज आंबेडकर भवन पाडकामाचा मुद्दा उपस्थित झाला. आंबेडकर भवनाबाबत राज्य सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले.

 

आंबेडकर भवन पाडल्यानंतर त्याठिकाणी पूर्वीसारखंच हेरिटेज स्ट्रक्चर बांधून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत दिली. मात्र ज्या ठिकाणी दोन मजल्यापेक्षा जास्त बांधकाम करण्यास मनाई असताना 17 मजली इमारत कशी उभी राहणार? सरकारचं नेमकं काय चाललं आहे?, असा सवाल अजित पवारांनी केला.

 

दरम्यान, आंबेडकर भवनाच्या विश्वस्तांनी 15 दिवसांपूर्वी रात्रीच इमारतीचं पाडकाम केलं. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांनी आक्षेप घेतला. तसंच याविरोधात दोन दिवसांपूर्वी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. सीताराम येचुरी, कन्हैयाकुमार यांनीही मोर्चात सहभाग घेतला होता.