मुंबई: उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही घोषणा केलीय. 5 किमीसाठी एसी लोकलचे प्रवासी भाडे आता 65 रुपयांऐवजी 30 रुपये असेल.
मुंबईतील एसी लोकलचे तिकीट दर हे जास्त असल्याने त्याला मिळणारा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीट दरात घट करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. आता या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मत प्रतिसाद दिला असून तिकीट दरात 50 टक्क्यांची घट केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे.
दरम्यान, सध्या एसी लोकलच्या तिकीटाचे दर किती आहेत आणि कपातीनंतर किती होऊ शकतात हे पाहुयात,
सध्याचे दर! कपातीनंतर दर इतके
कल्याण-सीएसएमटी 210 105
डोंबिवली-सीएसएमटी 205 105
दिवा-सीएसएमटी 190 95
ठाणे-सीएसएमटी 180 90
घाटकोपर-सीएसएमटी 135 70
कुर्ला-सीएसएमटी 135 70
दादर-सीएसएमटी 65 30
केंद्रीय मंत्री रावसाहेब यांनी आज एसी लोकल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, 2009 ते 2014 पर्यंत मुंबईला फक्त 1100 कोटीचा निधी देण्यात आला होता. मात्र, यंदा 11 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी अहमदनगर ते बीड रेल्वे या 7 तारखेपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही एसी लोकलच्या भाड्यात कपात केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.