मुंबई : लोकांचं कर्ज फेडण्यासाठी एक सुशिक्षित तरुणाने चक्क नकली नोटा बनवल्या. विशेष म्हणजे या नोटा कशा बनवायच्या हे तो यू ट्यूब व्हिडीओ पाहून शिकला. मुंबई पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून 100 रुपयांच्या 896 बनावट नोटा (89,600 मूल्य) पोलिसांनी जप्त केल्या.
बी फार्मा शिकलेला 27 वर्षीय दीपक घुंगे याने लोकांकडून कर्ज घेतले होतं. ते कर्ज फेडणं त्याला शक्य होत नव्हतं. तर लॉकडाऊनमुळे कुठे नोकरी मिळणेही अवघड झालं होतं. म्हणून दीपक घुंगेने नकली नोटा बनवून आपलं कर्ज परत फेडण्याचा पर्याय निवडला आणि शेवटी तुरुंगात पोहोचला.
29 सप्टेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की एक व्यक्ती भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन सीताराम मिल कंपाऊंड लोअर परळ इथे वितरित करण्यासाठी येणार आहे. माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेने क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात दीपक अडकला. त्याला ताब्यात घेऊन जेव्हा झडती घेण्यात आली. त्याच्याकडून भारतीय चलनाच्या शंभर रुपयांचे 896 बनावट नोटा (89,600 मूल्य) पोलिसांनी जप्त केल्या. दीपक घुंगेने यू ट्यूबवर व्हिडीओ पाहून या नोटा बनवल्या होत्या.
दीपक घुंगेची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने नोटा बनवण्यासाठी पुण्याच्या दौंड इथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्या फ्लॅटची माहिती मिळताच पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला आणि लॅपटॉप, लेझर स्कॅनर प्रिंटर, लॅमिनेटर, अर्धवट छपाई झालेल्या नोटांचे कागद, हिरव्या रंगाचे फाईल, बंडल पेपर आणि इतर साहित्य जप्त केलं.
आरोपीने फक्त शंभर रुपयांच्या नोटा बनवल्या होत्या, जेणेकरुन कोणाला कधीच संशय येणार नाही. कारण जर दोन हजारांच्या किंवा पाचशेची नोट असेल तर लोक ती एकदा तपासून पाहतात, मात्र शंभरची नोट क्वचितच कोणी तपासतो.
दीपक घुंगेने बी फार्मचं शिक्षण घेतल असून तो मूळचा सोलापूरचा आहे. नकली नोट छापण्यामध्ये तो एकटाच होता का? किंवा त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी होतं? याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा 3 चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक भारते, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती, पोलीस उपनिरीक्षक उघडे, सहायक फौजदार गावित, पोलीस हवालदार कोरेगावकर, जगदाळे, पालांडे, पोलीस नाईक नागवेकर, जाधव, पवार, मांगले पोलीस शिपाई सकपाळ, गायकवाड यांच्या पथकाने केला.