26/11 Mumbai Terror Attack : भारतातील कोणताही नागरिक 26 नोव्हेंबर ही तारीख विसरू शकत नाही. याच दिवशी पाकिस्तानी दहशतवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर हल्ला  (Mumbai Terrorist Attack 2008) करून संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. तसेच 10 हून अधिक जवान आणि पोलीस शहीद झाले होते. आज या दहशतवादी घटनेला 15 वर्षे पूर्ण होत आहेत. दहशतवादी कसाबला फासावर नेण्यात देविका रोटवान (Devika Rotawan) या मुलीचे मोठे योगदान होते. मुंबई हल्ल्यात देविकाच्या पायाला गोळी लागली होती. त्यावेळी ती फक्त 9 वर्षांची होती आणि आता ती 24 वर्षांची आहे. मुंबई दहशतवादी हल्ला जवळून पाहणाऱ्या देविकाचे स्वप्न IPS अधिकारी होण्याचे आहे.


इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात प्रदर्शित झालेल्या एका बातमीनुसार, सध्या देविका रोटवान ही मुंबईत राहते आणि ती चेतना कॉलेज, वांद्रे येथे बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) च्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देविका फक्त नऊ वर्षांची होती आणि ती तिच्या वडिलांसोबत सीएसटीवर उभी होती. त्यावेळी त्या ठिकाणी अजमल कसाब आणि ईस्माईल खान या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांची एक गोळी तिच्या उजव्या पायात घुसली. 


त्या भयानक दिवसाचा प्रत्येक क्षण आठवून आपल्या अंगावर अजूनही काटा येतो असं देविका म्हणते. कसाब ज्यावेळी गोळ्या चालवत होता त्यावेळी ती पाहत होती. तिच्यासमोरच हे सर्व घडत होतं, अनेकजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर अनेकजण आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. 


आयपीएस होण्याचं स्वप्न 


मुंबई दहशतवादी हल्ला आपल्या डोळ्यासमोर पाहणारी देविका आता 24 वर्षांची आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस आपल्या आयुष्यात न विसरणारा दिवस असल्याचं ती सांगते. तसेच आताही कधी कधी पायाला गोळी लागल्याचे दुखणे तिला जाणवते. भविष्यात आयपीएस अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न असल्याचं ती सांगते. 


या घटनेच्या अनेक वर्षांनंतर देविकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "त्या हल्ल्यानंतर जणू आमचे आयुष्यच ठप्प झाले होते. दहशतवाद्यांच्या भीतीने शेजारी आणि नातेवाईकांनीही आमच्यापासून दूर राहणे पसंत केले. आम्हाला राहायला घर देखील मिळत नव्हते. पप्पा छोटी नोकरी करायचे. भावालाही काम मिळत नव्हते."


ही बातमी वाचा: