मुंबई : मुंबईतील करीरोड आणि परळ स्टेशनदरम्यान ट्रॅकवर सापडलेल्या तरुणीच्या मृत्यूचा उलगडा करण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.  पल्लवी विकमसे (वय 20 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव असून ती लॉची विद्यार्थिनी होती. पल्लवीचा मृत्यू अपघात आणि आत्महत्या याचा पोलिस तपास करत आहेत.


पल्लवी ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया म्हणजेच आयसीएआयचे (ICAI) अध्यक्ष निलेश विकमसे यांची मुलगी आहे. 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पल्लवीचा मृतदेह ट्रॅकवर सापडला होता.  ती एका लॉ फर्ममध्ये इंटर्नशिप करत होती.

पल्लवीचे कुटुंबीय बुधवारी रात्रभर तिचा शोध घेत होते. पल्लवीचा मृतदेह परळ आणि करीरोड स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर आढळला. पण दुसऱ्या दिवशी गुरुवारी मृत्यूची हकीकत समोर आली तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. पोस्टमॉर्टेमनंतर पल्लवीचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पल्लवीने मृत्यूआधी वहिनीला मेसेज केला होता, ज्यात लिहिलं होतं की, "सॉरी, कोणीही जबाबदार नाही."

ज्या ट्रेनमध्ये पल्लवी प्रवास करत होती, ती डोंबिवलीला जाणारी धीमी लोकल होती. शिवाय त्यात फार गर्दीही नव्हती. पल्लवीला ट्रेनमधून पडताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी गीता गायकवाड यांनी सांगितलं की, "पडण्याआधी पल्लवी वारंवार ट्रेनमधून वाकून पाहत होती."

देशाचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटन्ट फर्म खीमजी कुंवरजी अँड कंपनीने पार्टनर निलेश विकमसे यांची धाकटी मुलगी होती. निलेश विकमसे 35 वर्षांपासून आयसीएआयचे सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष आहेत. पल्लवी बुधवारी फोर्टमधील एका लॉ फर्म ओआसिस काऊंसलमध्ये इंटर्नशिप करत होती.

पल्लवी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता फोर्टमधील ऑफिसमधून निघाली आणि सीएसटीवरुन ट्रेन पकडली. तोपर्यंत तिचा मोबाईल सुरु होता. 6.30 च्या सुमारास तिने तिच्या वहिनीला "सॉरी, कोणीही जबाबदार नाही," हा मेसेज केला होता. त्यानंतर वहिनी तातडीने तिला कॉल बॅक केला. एकदा रिंग वाजून कॉल कट झाला आणि त्यानंतर फोन स्विच ऑफ झाला.

रात्री उशिरापर्यंत पल्लवीबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी ऑफिस आणि मित्र-मैत्रिणींना कॉल केला. पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी सोशल मीडियावर पल्लवीचा फोटो आणि माहितीही अपलोड केली होती. एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती.

पल्लवीचा मृतदेह बुधवार रात्री 7.30 वाजता ट्रॅकवर सापडला. पण कुटुंबीयांना गुरुवारी पहाटे तिच्या मृत्यूबाबत समजलं. पल्ल्वीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलिस तपास करत आहेत.