मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांची कोंडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण पावसाळ्यापूर्वी मुंबईतील 20 धोकादायक पूल बंद करण्यात येणार आहेत. सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या ऑडिटमध्ये मुंबईतील 14 पूल धोकादायक ठरवण्यात आले आहेत.


या धोकादायक पुलांमध्ये मरिन लाईन्सजवळील पुलांचाही समावेश होता. त्यात आता उरलेल्या पुलांमध्ये जुहू ताराजवळील पूल, मेघवाडी नाल्याजवळील पूल, वांद्रे-धारावी नाल्याजवळील पुलांचा समावेश आहे. एकूण 8 पूल बंद ठेवून तोडण्यात आले आहेत. आता उरलेल्या पुलांवरही लवकरत दुरुस्ती किंवा हातोडा पडणार आहे.


सीएसएमटी पूल दुर्घटना

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनजवळ हिमालय पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तीन महिलांसहचा समावेश होता, तर 31 जण गंभीर जखमी झाले होते.


सीएसटीएम स्टेशनजवळ झालेल्या या पूल दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35), मोहन कायगुंडे अशा सात जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली होती.