मुंबई : मुंबईच्या वडाळा भागात दुचाकीचा अपघात होऊन दोन तरुण जबर जखमी झाले. अपघातानंतर तब्बल 45 मिनिटं या तरुणांनी मदतीची याचना केली. मात्र, एकही माणूस त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. लोक सोडाच पण, रात्रपाळीला रस्त्यावर गस्त घालणारी मुंबई पोर्ट ट्रस्टची गाडी अपघातस्थळावरुन गेली. मात्र आमचं काम गस्त घालण्याचं आहे, असं सांगून तेही तिथून निघून गेले.


 

काही लोकांनी धाडस करत ४५ मिनिटांनंतर जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसही तिथे दाखल झाले. सध्या दोघांवर उपचार सुरु असले तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे.

 

हे तरुण वडाळ्यावरुन जात असताना त्यांच्या बाईकचा अपघात झाला. दोन्ही तरुण वेदनेने तडफडत होते. त्यांचा आवाज ऐकून रस्त्यावरील काही लोक तिथे जमा झाले. त्यापैकी काहींनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्याचवेळी तिथून मुंबई पोर्ट ट्रस्टची गाडी जात होती. लोकांनी त्यांची मदत मागितली पण कर्मचाऱ्यांनी नकार दिला. हे पेट्रोलिंगची गाडी असल्याने आम्ही या तरुणांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

 

नियम शिथिल, मात्र असंवेदनशीलता कायम

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, या हेतूनं अनेक नियम शिथील केले. अपघातग्रस्तांना नेणाऱ्या लोकांना कायद्याचा जाच होऊ नये, म्हणून त्यांच्या चौकशीचा आग्रह धरु नका, रुग्णालयाने पोलिसांची वाट न बघता उपचार सुरु करावेत, अशा अनेक नियमांचा त्यात सहभाग होता.

 

मात्र, वडाळ्यात घडलेल्या घटनेनंतर अपघातापेक्षा माणसांची असंवेदनशीलताच भीषण असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.