मुंबई : किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयाला केंद्र सरकारने दणका दिला आहे. या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती देण्यात आली आहे.

 

दरम्यान, हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अटक केलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या सीईओंसह वैद्यकीय संचालकाचाही समावेश आहे.

 

सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी, डॉ. अनुराग नाईक, मुकेश शेटे, मुकेश शाह, प्रकाश शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

किडनी रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयाच्या 5 डॉक्टरांना अटक


 

हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांना ही कारवाई केली आहे. मुंबईमधील किडनी रॅकेट प्रकरणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. किती वर्षापासून हे रॅकेट सुरु होतं याची सध्या पोलिस चौकशी करत आहेत.

 

खोट्या कादगपत्रांच्या सहाय्याने खोट्या नातवाईकांची यादी या रुग्णालयातील टोळी बनवायची आणि यानंतर खऱ्याखुऱ्या गरजू लोकांना 25 ते 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात ही किडनी विकली यायची. मात्र प्रत्यक्षात किडनी देणाऱ्या व्यक्तीला काही हजार रुपये देऊन गप्प केलं जायचं.

 

काही दिवसांपूर्वी एका किडनी डोनरने एका सामाजिक संस्थेला सोबत घेऊन याठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा भांडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी या किडनी रॅकेटवर कारवाई करत 14 जणांना अटक केली आहे.