मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोरगरिबांना विविध आजारांवरील तब्बल 139 प्रकारच्या रक्तचाचण्या आता मोफत करुन मिळणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार यापुढे आता 'बीपीएल' कार्डधारकांना मोफत चाचण्या करुन मिळणार आहेत. तर इतर सर्वसामान्य रुग्णांना प्रया चाचण्यांसाठी फक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत.


मुंबईत महापालिकेची चार प्रमुख, माध्यमिक सेवा अंतर्गत 16 उपनगरीय आणि 5 विशेष रुग्णालये आहेत. शिवाय प्राथमिक आरोग्य सेवा अंतर्गत 175 दवाखाने आणि 28 प्रसुतीगृहे आहेत. रुग्णांना खासगी लॅबमधून चाचण्या करुन घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च करावे लागतात. पण या निर्णयामुळे हा संपूर्ण खर्च वाचणार आहे.

राज्यभरातील रुग्णांना फायदा
महापालिकेच्या रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे ते राज्याच्या कानाकोपर्‍यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्यांवर मोठा खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय आरोग्य मिशन' योजनेंतर्गत ही 'निदान व सेवा' पुरवली जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय गोरगरीबांना फायदेशीर ठरणार आहे.

कसा केला जाणार खर्च?
या उपक्रमासाठी शहर आणि उपनगरांसाठी थायरोकेअर आणि मेट्रोपॉलिस या प्रयोगशाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये चार वर्षांच्या कंत्राटासाठी पूर्व उनगरात मेट्रो पॉलिस हेल्थ केअर लिमिटेड काम करणार असून यासाठी 26.86 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये 8 उपनगरीय रुग्णालये, 47 दवाखाने आणि 10 प्रसुतीगृहांत ही सेवा मिळेल.

पश्चिम उपनगरांत थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी 29.14 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये 8 उपनगरीय रुग्णालये, 58 दवाखाने आणि 13 प्रसुतीगृहांत ही सुविधा मिळेल.

शहर विभागासाठी थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी 23.18 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये 5 विशेष रुग्णालये, 70 दवाखाने आणि 10 प्रसुतीगृहांमध्ये ही सुविधा मिळणार आहे.