मुंबईतील भांडूपमध्ये अज्ञातांकडून तब्बल 13 गाड्यांची जाळपोळ
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2017 09:03 AM (IST)
मुंबई: मुंबईतील भांडूपध्ये श्रीरामपाडा परिसरात काल मध्यरात्री तब्बल 13 वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञातांनी तब्बल 11 दुचाकी, 2 चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. वैयक्तिक वादातून ही जाळपोळ करण्यात आली असावी असा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येतो आहे. मात्र, या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये जाळपोळीत सर्वच वाहनं जळाली असून यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या प्रकारानंतर वाहन मालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे. मात्र, अद्यापही आरोपींबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, याआधी नाशिक, पुण्यात अनेकदा बाईक जळीतकांड समोर आलं होतं. मात्र, आता असाच प्रकार मुंबईत घडल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तसंच आरोपींना अटक करण्याचंही मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.