सुंदर स्त्री बघितल्यावर आपले मन जसे प्रफुल्लित होते तसेच नीटनेटका, टापटीप हँडसम मनुष्य पाहिल्यावर कदाचित मुलींना सुद्धा छान वाटत असेल. हा विचार मनात येऊन काही पुरुष आजकाल दिसण्यावर भर देत आहेत. आपापलं जे काय कार्यक्षेत्र असेल त्यात उत्तम करण्याचा प्रयत्न असतानाच ही मंडळी दिसण्यावर ही फोकस करत आहेत ही तशी सुखद बाब आहे. मग डायटवर लक्ष, व्यायाम, चांगले कपडे वापरणे, परफ्युम /जेल वगैरै, पार्लर ला कधीमधी भेट हे सगळं आलंच.
याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून निरनिराळ्या फॅशन येत असतात. सध्या दाढी वाढवण्याची फॅशन गेली काही वर्षे जोमात आहे. सोशल मीडिया हा त्याचा आरसाच. नो शेव्ह नोव्हेंबरचे निमित्त साधून, Brewing Beard या फेसबुक पेजमार्फत दरवर्षी फेसबुकवर देखणा दाढीवाला निवडण्याची स्पर्धा घेतली जाते. यंदाचे हे स्पर्धेचे चौथे वर्ष. यावर्षीदेखील या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 468 पुरुषांनीं या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धकांचे फोटो पेजवर अपलोड केले जातात. फेसबुक युजर्स त्यांना आवडलेल्या फोटोला लाईक करुन तसेच त्यावर रिऍक्ट होऊन आपले मत नोंदवू शकतात. आयोजकांतर्फे काही परीक्षक सुद्धा नेमण्यात आले आहेत. परीक्षकांचे 50% गुण आणि पब्लिक व्होटिंगचे 50% गुण यातून विजेता निवडला जातो. तसेच फक्त परीक्षकांनी दिलेल्या गुणांवर ज्युरी अवॉर्ड्स दिले जातात. विजेत्यांना Mr Beardsome या किताबासोबत रु. 5000(प्रथम), रु. 3000 (द्वितीय), रु. 1000 (तृतीय) अशी पारितोषिके दिली जातात.
दोन आठवड्यापूर्वी स्पर्धा चालू झाल्यापासून तीन लाखांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सपर्यंत ही स्पर्धा पोहोचली आहे. सध्या गाजत असलेल्या 'डॉ बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत काम करणारी आदिती द्रविड यावर्षीच्या स्पर्धेचे निवेदन करत आहे. नुकतेच तिने फेसबुक लाईव्ह येऊन स्पर्धेची माहिती दिली आणि स्पर्धेसंबंधी प्रश्नांना लाईव्ह उत्तरे दिली.
सोमवारी दोन डिसेंबरला यावर्षीचा Mr Beardsome जाहीर होईल. सर्व महाराष्ट्राला यावर्षीचा विजेता कोण होईल? याची उत्सुकता लागून राहिली आहे.