Sanjay Raut : शिवसेनेविरोधात बंडाळी केलेल्या आमदारांविरोधात शिवसेनेकडून एका बाजूने कायदेशीर लढा सुरु करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूने रस्त्यावर उतरून शिवसैनिकांचे मेळावे घेतले जात आहेत. आज दहिसरमध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकेक बंडखोर आमदारांची नावे घेत तुफानी हल्ला चढवला.
मंत्री गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव तसेच त्यांच्या पत्नी यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे यांचा चांगलाच समाचार घेतला. अब्दुल सत्तारचं कसलं हिंदुत्व धोक्यात आलंय ? अशी विचारणाही त्यांनी केली.
गुलाबराव पाटील परत पानटपरीवर बसतील
शिवसेना खासदार संजय राऊत बंडाळी केलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर चांगलाच कडाडून हल्ला चढवला. हे गुलाबराव पाटील कसली भाषण ? जस काय शिवसेनेत कोणी वाघच नाही, पण ढुंगणाला पाय लावून पळून गेले. गुलाबराव पाटील आता परत पानटपरीवर बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत थेटच बोलले, 'प्रताप सरनाईकांनी सांगितलं फडवणीस मला अमित शाहांकडे घेऊन गेले अन् माझं ईडीचं मॅटर साफ झालं',
संदीपान भुमरे पैठणच्या साखर कारखान्यात वाॅचमन
संदीपान भुमरे यांच्यावरही त्यांनी हल्ला चढवला. राऊत म्हणाले की हे संदीप भुमरे पैठणच्या साखर कारखान्यात वाॅचमन होते. मोरेश्वर सावे यांचं तिकिट कापून बाळासाहेबांनी त्यांना तिकिट दिलं. त्यानंतर मुंबईला आलेल्या भुमरेंना हाॅटेलमध्ये वडा सांबर खाता येत नव्हतं, जमिनीवर बसून खात होते, आज कॅबिनेट मंत्री झाले. उद्धव ठाकरेंकडे आले, माझ्याकडे आले, शिवसेनेमुळे मी मंत्री झालो, म्हणून रडायला लागले पण ते किती खोटे अश्रू होते हे सगळं कळतंय.
प्रताप सरनाईक
मी प्रताप सरनाईकांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस आहे म्हणून दिल्लीत आलो आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मला फोन करुन सांगितलं की, 'देवेंद्र फडवणीस मला भेटले. ते मला अमित शहांकडे घेऊन गेले आणि माझं ईडीचं मॅटर क्लिअर साफ झालं. त्यामुळं मी आता सूरतला जात आहे, असं सरनाईक म्हणाल्याचे संजय राऊत म्हणाले. अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी मोठी हजारो कोटींची भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाल्याची विचारणा त्यांनी केली.
प्रकाश सुर्वे भाजी विकत होते
आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावरही त्यांनी टिकास्त्र सोडले. आता परत त्यांना भाजी विकायला पाठवूया. प्रकास सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला.
नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडेच
संजय राऊत यांनी तानाजी सावंत यांच्यावरही टिकास्त्र सोडले. नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडेचं. हे थांबले पाहिजे आणि आपल्यातील अजूनही गद्दार शोधले पाहिजेत, असा संदेश संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला.
यशवंत जाधव
यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नीवर देखील किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मात्र ते दोघेही दिल्लीला गेले आणि त्यांनाही वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि ते स्वच्छ झाले. ते सूरतवरुन थेट गुवाहाटीला गेले. काय वॉशिंग मशीन आहे.
किरीट सोमय्या बेरोजगार
संजय राऊत यांनी यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. किरीट सोमय्या आता बेरोजगार होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. सोमय्या दररोज सकाळी वृत्तवाहिन्यांवर प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव, यामिनी जाधव यांना तुरुंगात पाठवणार असल्याचे म्हणायचे.
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी ईडीचे प्रकरण मिटवले असून आपण सुरत जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितल्याचेही राऊत म्हणाले. माझ्यावरही ईडीची कारवाई झाली. राहते घर, वडिलोपार्जित जमीन जप्त करण्यात आली. लहान मुलींवर ईडीची कारवाई झाली. मात्र, आम्ही गुडघे टेकले नसल्याचे राऊत म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या