MIM Tiranga Rally 2021 : एमआयएम खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी मुंबईतील चांदिवली येथील सभेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. मी मुंबईत येऊ नये म्हणून पूर्ण ताकद लावली. पण मी अखेर मुंबईत आलो. रॅली दरम्यान पोलिसांनी अनेकदा अडवलं. औरंगाबादवरुन आम्ही 225 गाड्या घेऊन आलो. अनेक ठिकाणी आम्हाला आडवलं. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे पुढे नाही जाऊ देणार, असं सांगितलं गेलं. पण आम्ही मुंबईत आलोच. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. ते फक्त आदेश मानत होते. त्यात त्यांची काहीच चूक नव्हती, असे इम्तियाज जलील म्हणाले. 


मराठा बांधवांकडून खूप शिकण्यासारखं आहे. आरक्षणासाठी काढलेल्या रॅलीमध्ये ते फक्त मराठा म्हणून उतरले. ते कोणत्याही पक्षाचे नव्हते. त्यात ना शिवसेना, भाजप, काँग्रेस ना राष्ट्रवादी काँग्रेस या कोणत्याच पक्षाचे लोक नव्हते. ते फक्त मराठा म्हणून मैदानात उतरले होते. त्यामुळे मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्यालाही तसेच मैदानात उतरावे लागेल, असे जलील म्हणाले. 


आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या रॅलीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मंजिल मिले ना मिले ये मुकदर की बात है...मगर हम कोशिश ना करे ओ गलत बात है! त्यामुळे पूर्ण इमानदारीनं आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. ही फक्त सुरुवात आहे. खरी लढाई बाकी आहे, असे जलील म्हणाले. अन्याय होत असल्यास आम्ही गप्प बसायचं का? असा सवाल जलील यांनी यावेळी उपस्थित केला. 



मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये : असदुद्दीन ओवेसी
मुस्लिम आरक्षणावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने भाषणे दिली. परंतु आरक्षण कुठे आहे?  कधीपर्यंत तुम्ही अशीच फसवणूक करून घेणार आहे.  शरद पवार, राहुल गांधी यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावे. तुम्ही सन 1992 मध्ये काय झाले हे विसरलेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की, बाबरी मशिद आम्ही पाडली आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीला काही वाटले नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही ओवेसी यांनी म्हटले.


मुस्लिमांना आरक्षण का नाही?
महाराष्ट्रातील 93 टक्के मुस्लिमांकडे स्वत:च्या जमिन नाही.ज्यांच्याकडे जमिन आहे, त्यांना आरक्षण दिले जात आहे. तर, ज्यांच्याकडे काही नाही, त्यांना आरक्षण नाही. असेही ओवेसी यांनी म्हटले. संविधानामध्ये जे सेक्युलॅरिसम आहे  त्याला मी मानतो. राजकारणातील  सेक्युलॅरिसम मी  मानत नाही. देशाच्या संविधानामध्ये सांगितले आहे की  कोणाला आरक्षण मिळायला हवे. कोर्टाने सांगितलं की, मुस्लिमांना  आरक्षण मिळायला हवे. पण हे थ्री इन वन सरकार हे विसरले आणि आता मराठा आरक्षणाचा गप्पा करत आहेत.