ठाणे : वनविभागाची परवानगी मिळत नसल्यामुळे आणि मिरा-भाईंदर आणि नवी मुंबई शहरातील अनेक विकास कामे रखडली आहेत. या विकास कामांना गती देण्यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी वनविभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पातील वनविभागाचे अडथळे दूर झाले असून आता हे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे, अशी माहिती विचारे यांनी दिली.
सर्वात आधी गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत बांधण्यात येणाऱ्या उन्नत मार्गात वन विभागाची जागा हवी होती. त्यानुसार येत्या दोन दिवसात वाइल्ड लाइफची जागा निश्चित करून सदर सुधारित प्रस्ताव केंद्रस्त अधिकारी नागपूर यांना पाठविण्यात आल्यानंतर आठ दिवसात मान्यता देण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आहे. हा उन्नत मार्ग झाल्यास घोडबंदर रोडवरील अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होईल. दुसरे म्हणजे घोडबंदर रोडवरील कोलशेत ते भाईंदर पाडा दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जागा येत असल्याने सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी होत होती. त्यावर जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव केंद्रस्थ अधिकारी नागपूर येथे पाठविण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून केंद्र शासनाच्या विभागास पाठविण्यात आलेला आहे. येत्या आठ दिवसात यांना मान्यता देऊन महापालिकेकडून उर्वरित पूर्तता करून त्यास मंजुरी देण्यात येईल असे नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी विचारे यांना दिली.
या बरोबर 12 वर्ष रखडलेल्या घणसोली-ऐरोली पाम बीच रस्त्याबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली पुढे मुलुंड काटई उन्नत मार्गाला जोडण्याचा प्रस्ताव देखील आज मांडण्यात आला. सी आर झेड आणि इतर राज्य आणि केंद्र सरकारच्या कायद्यांमुळे हा रस्ता प्रलंबित असल्याने त्यावर देखील तिच्या आठ दिवसात निर्णय घेऊन अडथळा दूर करण्याचे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले आहे. तसेच घणसोली येथील गवळीदेव या क्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास आणि पामबीच रोडवर सायकल ट्रॅक बनवण्यासाठी देखील विभाग सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन हजर राजन विचारे यांना आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha