अमोल यादवांच्या विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये जागा मिळणार!
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2018 02:17 PM (IST)
यासाठी अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला आहे.
मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने जागाही दिली आहे. पालघरमध्ये एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. त्यामुळे अखेर अमोल यादव यांची प्रतीक्षा संपली आहे. आता राज्य सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करुन जागेचा ताबा द्यावा. कारखाना उभा करुन त्यामध्ये पहिलं विमान तयार होण्याची प्रतीक्षा आहे, असं अमोल यादव एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. भारतातील हा पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असेल, जो महाराष्ट्रात सुरु होत आहे. 20 नोव्हेंबर रोजीच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं होतं. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचं पत्र देण्यात आलं होतं. पहिलं स्वदेशी विमान बनवण्याचा प्रवास विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोपमधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्याने उड्डाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली.