'शीना बोरा आणि आरूषीप्रमाणे ठार मारेन', आईची मुलीला धमकी
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2016 03:47 AM (IST)
मुंबई: आई... या दोन अक्षरी शब्दाची महती सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात. मात्र मुंबईतल्या एका आईनं आपल्याच मुलीला आरुषी आणि शीना बोराप्रमाणं जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीला दुखा:च्या दरीत लोटणाऱ्या त्या महिलेचं नाव आहे मृणाल पाटील. पेशानं चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या मृणाल पाटीलच्या दुष्कृत्याचा पाढा तिच्या मुलीनं पोलिसांसमोर वाचून दाखवला आहे. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. मृणाल पाटीलची तीन लग्न झाली आहेत. मात्र एकाही पतीबरोबर न पटल्यानं मृणाल पाटील आपल्या 15 वर्षीय मुलीसह स्वतंत्र राहते आहे. दरम्यान मृणाल पाटीलचं आणखी एका इसमाशी सूत जुळल्याची शंका मुलीनं उपस्थित केली होती. या प्रकरणाची कुठे वाच्यता करू नये म्हणून आईनं जीवे मारण्याची धमकी देऊन डांबून ठेवलं अशी तक्रार मुलीनं केली आहे.