मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वे दु्र्दैवाने 'लाईफ घेणारी लाईन'ही ठरत आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक गर्दीच्या ठाणे रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई लोकल आणि रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात ठाणे रेल्वे स्थानकावर सर्वाधिक प्रवाशांचे बळी गेल्याचं समोर आलं आहे.
एक जानेवारी 2018 ते 12 मे 2018 या अवघ्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत ठाणे रेल्वे स्टेशनवर 112 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ठाणे हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्टेशन असून याच स्थानकावर सर्वाधिक बळी गेल्याचं समोर आलं आहे.
ठाण्यानंतर क्रमांक लागतो तो मध्ये रेल्वेवरीलच कल्याण स्टेशनचा. कल्याण स्टेशनवर 110 प्रवाशांना अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर बोरीवली स्टेशन असून इथे 107 प्रवाशांनी गेल्या साडेचार महिन्यांत जीव गमावला आहे. बोरीवली हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात 'जीवघेणं' स्टेशन ठरलं आहे.
कुर्ला स्थानक चौथ्या क्रमांकावर असून या रेल्वे स्टेशनच्या हद्दीत 80 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागात मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या हद्दीत नवीन वर्षात एकूण 979 रेल्वेबळी गेले आहेत.