मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू आणि माजी नगरसेवक विनोद शेलार यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपाच्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं खोटं सांगून मॉडेलची ऑडिशन घेण्यात आली. तिला अंधारात ठेवून 'विनोद शेलार यांनी माझा विनयभंग केला' असा चित्रित करुन घेतलेला 'बनावट भाग' प्रत्यक्षात आरोप करण्यासाठी वापरण्यात आला. विनोद शेलारांचे राजकीय विरोधक असलेल्या भाजपमधीलच ब्रिजेश सिंह यांनी हा प्रकार घडवून आणल्याचं समोर आलं आहे.


विनोद शेलार हे भाजपचे मुंबई उत्तर विभागाचे प्रमुख असून ते मालाड पश्चिममधून नगरसेवक होते. विनोद शेलार यांनी विनयभंग केल्याचा आरोप करणारा एका मॉडेलचा व्हिडिओ गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात समोर आला होता. मालाडमध्ये दहीहंडी उत्सवाच्या वेळी विनोद शेलारांनी छेडछाड केल्याचं तिने म्हटल्याचं व्हिडिओत दिसत होतं. 'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

विनोद शेलारांचे राजकीय शत्रू आणि भाजपचे माजी पदाधिकारी ब्रिजेश केशव प्रसाद सिंग यांनीच हा प्रकार घडवून आणला. पत्रकार फ्लाएन रेमेडियोसच्या साथीने त्यांनी 'बिग बॉस ऑडिशन'चा बनाव रचला. पोलिसांनी रेमेडियोस, ब्रिजेश सिंग आणि त्याचा सहकारी राहुल सिंग यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. विनोद शेलारांवर आरोप करणारी मॉडेल तरुणी या प्रकरणात साक्षीदार झाली आहे.

रेमेडिओसने 'स्कूप्स.इंडियास्कूप्स.कॉम' या न्यूज वेबसाईटवर एका मॉडेलने विनोद शेलारांवर विनयभंगाचा आरोप केल्याची बातमी दिली होती. मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संबंधित मॉडेल कोर्टात जाणार असल्याचं त्या बातमीत लिहिलं होतं. मात्र विनोद शेलारांनी अशी कुठलीच घटना घडली नसल्याचं सांगत मालाड पोलिसात अशी कोणतीच महिला तक्रार नोंदवायला गेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बिथरलेल्या रेमेडिओने 'त्या' मॉडेलकडून व्हिडिओ बनवून घेतला

कसा केला व्हिडिओ?

रेमेडिओसने संबंधित मॉडेलला बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं आमिष दाखवलं. ऑडिशनची स्क्रिप्ट म्हणून तिच्याकडून 'विनोद शेलार यांनी माझा विनयभंग केला' अशा आशयाच्या लाईन्स वाचून घेतल्या. 'आपल्याला विनोद शेलार कोण, हेही माहित नव्हतं. केवळ ऑडिशनमधील वाक्य म्हणून ते म्हटलं' असं मॉडेलने सांगितलं. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग केवळ ऑडिशनचा भाग असल्याचं मॉडेलला भासवलं होतं, असं त्यांच्या चॅट आणि फोन रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, ब्रिजेश सिंह यांनीही आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आलं असून मी हायकोर्टात धाव घेणार आहे, असंही ते म्हणाले.