मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर शुक्रवारी चेंगराचेंगरी झाल्याने 23 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आणि रेल्वेच्या विविध प्रश्नावर आज चर्चगेट येथे मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळं आता आज नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोर्चा कसा असेल?
  • सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरेंचं आगमन होईल
  • राज ठाकरे आल्यानंतर मोर्चा सुरु होईल
  • महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल
  • चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
  • राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
  • मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
  • चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील
मोर्चात सहभागी व्हा, मनसेकडून आवाहन रेल्वेच्या प्रश्नावर मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून, सोशल मीडियावरही फोटो शेअर करुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज ठाकरे काय बोलणार? मनसेच्या मोर्चाला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात, याचसोबत राज ठाकरे मोर्चानंतरच्या भाषणातून कुणावर निशाणा साधतात, याकडे मुंबईकरांसह सर्वांचंच लक्ष लागलं आहे.