मुंबई मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंची एसीबीकडे तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2017 12:01 PM (IST)
शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याचा दावा तुर्डे यांनी केला आहे.
मुंबई : मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याचा दावा तुर्डे यांनी केला आहे. एसीबीला पत्र लिहून तुर्डेंनी ही माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. राज ठाकरेंसोबत प्रामाणिक : मनसे नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितलं, असं संजय तुर्डे म्हणाले होते. गेल्या आठवड्यात मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत.